Sustainability

पर्यावरण अन् व्यवसायाची अनोखी सांगड

कोरोना काळात कंपनीमधून काही कर्मचाऱ्यांना सोडून जाण्यासाठी सांगण्यात आले होते. दरम्यान, आपल्याला राजीनामा द्या, असे सांगण्याआधीच मी ऑफीस सोडण्याचा निर्णय घेतला आणि जी गोष्टी खूप आधीच सुरू करायची होती, त्याचा निर्णय घेतला. समाजहित आणि पर्यावरण यासाठी काम करायचे ठरवले. त्यातून सुरू केले ‘अर्दिंग’ पर्यावरणपूरक वस्तू तयार करणे आणि समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागृती आणि त्यातून माझे अर्थार्जन करण्यास सुरुवात केली.

पुढची वाटचाल पर्यावरणपूरक कामासाठीच करून आपल्या अनुभवाची आणि पॅशनची सांगड घालायची ठरवली. माझे कुटुंब गेले पंधरा ते वीस वर्षापासून एक ‘zerowaste’ परिवार आहे. त्यातील अनुभव व पर्यावरणाला होणारे फायदे दिवसेंदिवस किती महत्त्वाचे आहेत, ते प्रकर्षाने जाणवले व हेच प्रॅक्टिकल ज्ञान खूप जास्त लोकांपर्यंत पोचवायचे असे ठरवले. त्यातून अस्तित्वात आले आमचे ‘अर्दिंग स्टोअर’, ज्यात असे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, जे प्रदूषण कमी करण्यास आपल्याला मदत करून आपल्याला ‘शून्य कचरा’च्या दिशेने खूप पाऊल पुढे नेते.

लोकांना आमच्या ‘अर्दिंग स्टोअर’ची कल्पना खूप आवडली; पण प्लास्टिक वस्तूंना राम राम म्हणून बांबू टूथब्रश व नारळाच्या काथ्याची घासणी यांचा पर्याय म्हणून वापर करणे अजूनही लोकांना अवघड वाटते. आपले पूर्वज याच काथ्याने लख्ख भांडी घासायचे. आपल्या सर्वांना माहीत असेल, की landfill मध्ये methane उत्सर्जन होते. ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते.

आत्तापर्यंत ‘अर्दिंग स्टोअर’ने २५०० बांबू टूथब्रशची विक्री केली आहे. बांबू टूथब्रशचे नव्वद टक्के विघटन स्वतःच्या कुंडीत होते. आमच्यप्रयत्नांमुळे दोन हजार सिंथेटिक घासण्या पाण्याच्या स्रोतात जाण्यापासून वाचल्या. आम्ही तीन हजार use n throw Cup वाचवले आहेत. रियुजेबल फोल्डिंग स्टील कपमुळे, पर्यावरणपूरक स्वच्छता उत्पादनांमुळे दोन हजार पाचशे लिटर हानिकारक रासायनिक घटक पाण्याच्या स्रोतांमध्ये जाण्याचे वाचले आहेत.

हे सांगण्यामागील हेतू म्हणजे सर्वांनी अशीच म्हणजे बांबू, काथ्या अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या वस्तू वापरल्या, तर निसर्गाचा ऱ्हास कमी होईल व एक दिवस नक्की असा येईल की आपण एक स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त देश व पृथ्वी पुढच्या पिढीसाठी ठेवू शकू. कारण असे करण्यातच आपली पिढी एक जबाबदार पिढी आहे, हे दाखवून देता येईल.

 

महिलांचा उद्योगाचा मंत्र

पूर्वीपासूनच पर्यावरणपूरक जीवनशैली व पर्यावरण जपणूक यात बऱ्याचदा महिलांनीच मोलाचा वाटा उचलला आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा पर्यावरणाचा समतोल पूर्ववत आणायची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. हा संदेश घराघरांत पोचवून बदल घडवून आणूयात व शून्य कचरा जीवनशैली अंगीकारून आपल्या वसुंधरेचे पांग फेडू व प्रदूषणावर मात करू शकतो. महिला ठरवतील ती गोष्ट करू शकतात. त्यामुळे निर्णय घ्या. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याच सुरुवात करा.

(शब्दांकन – सुचिता गायकवाड)